साधारण देवदासी या शब्दाची उकल केली की असं वाटतं की,देवाची सेवा करणारी म्हणजे देवदासी!
देवदासी या प्रथेचे मुळ येथील शोषण व्यवस्था,धर्म आणी अंधश्रद्धेमध्ये आहे.पुर्वी मंदीरांमध्ये पुजाऱ्यासोबत देवाची सेवा करण्यासाठी महीला सर्रास असतं.
एखाद्याला मुल-बाळ होत नसेल तर झालेले पहीले मुल देवीला सोडु असा नवस बोलतात आणी योगायोगाने पाळणा हलला की खरोखरंच ते मुल देवीला सोडतात म्हणजे त्या मुलीचे लग्न देवीसोबत लावले जाते.देवी सोबत लग्न लागले की ती मुलगी देवदासी होते.
मुला-मुलींच्या केसात जट निघाली की अशी मुले सुद्धा देवदासी होण्यासाठी सोडली जातात.
कर्नाटक आणी महाराष्ट्रात देवदासींचे प्रमाण आधीक आहे.जवळपास ९०% देवदासी या यल्लमा देवीच्या आहेत.
यल्लमा म्हणजे रेणुका देवी.यल्लमा देवीचे महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशात बरीचं मंदीरे आहेत.त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती,कोकटनुर व शिमोगा जिल्ह्यातील चंद्रगुत्तीची यल्लमा प्रसिद्ध आहे.
चंद्रगुत्ती येथे यल्लमा देवीची पुजा करण्यासाठी "नग्नपुजा" ही देखील एक प्रथा होती.या मध्ये महिला-पुरूष नग्न होऊन याञेच्या काळात यल्लमाची पुजा करायचे.
एकदा का मुलीचे लग्न देवीसोबत लागले की ती देवदासी बनते व देवी तिची नवरा होते असा समज ही प्रथा पाळणाऱ्या लोकांचा आहे.देवदासी झाल्यानंतर देवाची सेवा करणे व भिक्षा मागुन पोट भरणे हा देवदासींचा नित्यक्रम ठरतो.देवदासी वयात आल्यानंतर तिचा "झुलवा" लावल्या जातो.
झुलवा लावणे म्हणजे तिच्या शरीराचा भोग घेण्यासाठी एखाद्या श्रीमंत किंवा सावकाराची निवड करण्यात येते.देवदासी वयात आली की,तिच्या आई-वडीलांकडे श्रीमंत व सावकार झुलवा लावण्यासाठी आग्रह धरतात.त्याबदल्यात रक्कम,सोने,राशन व तिला निट सांभाळण्याचे वचन देतात.
झुलवा लावण्याच्या दिवशी संपूर्ण गावाला जेवन दिले जाते.'झुलवा' लावण्यासाठी लग्नासारखा मांडव घातला जातो.मांडवात झुलवा लावुन घेणारा व्यक्ती देवदासीला मांडीवर घेऊन बसतो व विधी केल्या जातो.त्या दिवसापासुन देवदासी त्या श्रीमंत व्यक्तीची होते.यालाचं म्हणतात झुलवा लावणे!
झुलवा लावल्यानंतर तिचा फक्त उपभोग घेतल्या जातो.तीला संपत्तीवर अधिकार मिळत नाही तसेचं झुलवा लावुन घेणाऱ्याने तिला आयुष्यभर सांभाळावे असे कुठलेही बंधन नसते.त्यामुळे देवदासींच्या तारुण्याचा उपभोग घेऊन मुला-बाळांसकट तिला सोडुन दिल्या जाते.
देवदासीला सोडुन दिल्यानंतर तिच्याकडे जोगव्याशिवाय पर्याय उरत नाही.माञ नुसत्या जोगव्यावर तिचा उदरनिर्वाह चालत नाही.अशा प्रकारे देवदासीला पैसा मिळवण्यासाठी शहरातील वेश्या-व्यवसायाकडे जावे लागते.आजही वेश्या-व्यवसाय करणाऱ्या महिलांपैकी जास्त महिला देवदासी प्रथेतुन आल्या आहेत.
देवदासी म्हणुन सोडलेली मुलं ज्यांना जोग्या किंवा जोगटा म्हटले त्यांची परीस्थीती यापेक्षा वेगळी नाही.ते सुद्धा वेश्या-व्यवसायात दलाल म्हणुन काम करतात.
स्वातंञ्यानंतर जवळपास दोन लाख महिला देव-देवतांना सोडण्यात आल्या आहेत.
आज देवदासी प्रथेवर कायदेशीर बंदी आहे.तरीही हि प्रथा काही भागात चोरुन-लपुन पाळली जाते.९ जुलै २०१७ ला कर्नाटक मध्ये आई-वडीलांना स्वतःच्या मुलीला देवदासी होण्यासाठी भाग पाडले यावरुन अटक करण्यात आली आहे.
देवदासी हि प्रथा एक प्रकारे मानवी अधीकारांच उल्लंघन,महिलांच शोषण व देवदासी झालेल्या मुलींना वेश्या होण्यास भाग पाडणारी धर्ममान्य प्रथा आहे.अनेकांनी हि प्रथा बंद करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले आहे त्यांना कमी-अधीक प्रमाणात यशही आले परंतु आधुनिक काळात सुद्धा देवदासी अस्तित्वात आहे.त्याचे कारण येथील लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा व धार्मिक विचारांचा पगडा!