Pingaleshwar Mahadev Temple(Shivlinga Temple) |
परभणी पासुन १० कि.मी अंतरावर पिंगळी हे गाव आहे.पिंगळी स्टेशन म्हणुन सुद्धा हे गाव ओळखले जाते.हैदराबाद-औरंगाबाद लोह मार्गावर हे पिंगळी स्टेशन आहे.
आज आपण Incredible Marathwada या मोहीमेत पिंगळी येथील शिवलींग मंदिर व बारंव पाहणार आहोत.
ञिदल पद्धतीचे हे मंदीर आहे.स्थपती आणि शिल्पी यांच्या संयुक्त कारागिरीतुन याची निर्मिती झाली.याचा निश्चित निर्मिती काळ आपण सांगु शकत नाही परंतु शिल्पाविष्कारावरुन हे मंदिर १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असावे असे वाटते.
हे मंदीर पाच फुट उंचीच्या पिठावर बनवलेले आहे.मंदीराचा मुखमंडप अर्धमंडप प्रकारातला आहे.मंदीराला एक मुख्य गर्भगृह असुन दक्षिण-उत्तर दोन छोटी गर्भगृहे आहेत.मंदीराचा रंगमंडप चार स्तंभावर असुन वितान आकर्षक आहे.रंगमंडपात नंदीचे शिल्प आहे.गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर दोन देवकोष्ट आहेत.या देवकोष्टकात सध्या मुर्ती नाहीत.अंतरालानंतर गर्भगृहाची द्वारशाखा आहे.या द्वारशाखेच्या ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.द्वारशाखेच्या दोन्ही बाजुस अप्सरा,यक्ष व द्वारपाल आहेत.गर्भगृहात शिवलींग आहे.गर्भगृह आकाराने लहान आहे.एका वेळेस जास्तीत-जास्त दोन व्यक्ती दर्शन घेऊ शकतात.दक्षिणेकडील गर्भगृहात गावकऱ्यांनी आता नविन पलास्टर ऑफ पॅरीसची गणपतीची मुर्ती बसवली आहे तर उत्तरेकडील गर्भगृहाला स्टोअर रुम बनवले आहे.मंदिरातील स्तंभाच्या मध्यावर व्याल,हत्ती,कृष्णलिला,वराह अवतार,भौमीतीय शिल्पकला,अप्सरांचे नृत्यशिल्प,मोर व राजहंस शिल्प आहेत.स्तंभाच्या कर्णावर नागशिल्पे आहेत.मंदीराच्या पिठावरुनचं प्रदक्षिणा मार्गाची सोय केलेली आहे.मंदीराच्या बाहेरुन तिन देवकोष्ट आहेत जे आपल्याला रिकामे दिसतात.अर्धमंडपाच्या भिंतीवर भौमीतीय शिल्प जे रत्नासारखे दिसते,तसेचं अप्सरा व कामक्रीडा शिल्पे आहेत.मंदीराला शिखर नसुन छताच्या बाह्यांगाची पुनर्रचना करण्यात आली आहे.मंदीराच्या पिठावरील भिंतीवर सुद्धा भौमीतीय रत्न शिल्पे चोहोबाजुंनी आहेत.
मंदीर पुर्वमुखी असुन पुर्वेकडे बारंव(पुष्कर्णी)आहे.प्राचीन बारंव स्थापत्य शास्ञाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन आपण या बारवेकडे पाहु शकतो.चारही बाजुंनी बारवेला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.बारवेच्या आतुन सात देवकोष्ट आहेत ज्यात शिल्पमुर्ती आहेत माञ भग्नावस्थेत त्या आपणास पहायला मिळतात.बारवेच्या तळातील एका पायरीवर नागाचे शिल्प आहे.सध्या बारवेला पाणी आहे माञ त्याचा उपयोग केल्या जात नाही.उन्हाळ्यात हा बारवं आटतो.
स्थानिक येथील शिवलींगाला पिंगळी या गावाच्या नावावरुन "पिंगळेश्वर" असे संबोधतात.या मंदीराची पुरातत्व खात्यामध्ये नोंद नाही.स्थानिकांनी निधी जमा करुन मंदीराचा छत दुरूस्त केला आहे.मंदीरातील आतील भागाला ऑईल पेंट कलर मारल्यामुळे जुनं रुप मंदीर हरवुन बसले आहे.
अत्यंत प्रेक्षणीय अशे हे स्थळ आहे.परभणी वरुन पिंगळी-परभणी अशी बससेवा आहे.तसेचं नांदेड-औरंगाबाद लोहमार्गावर पिंगळी स्टेशन आहे त्यामुळे तुम्ही रेल्वेने सुद्धा जाऊ शकता.स्वतःचे वाहन टु-व्हिलर,फोर-व्हिलर असल्यास परभणी वरुन वसमत रोडवरील खानापुर फाट्यावरुन पिंगळीला रस्ता जातो.येथुन फक्त ९ कि.मी अंतरावर पिंगळी आहे.पिंगळी हे ६५००+ लोकसंख्येचे गाव आहे.येथे चहा-फराळ साठी हॉटेल उपलब्ध आहेत.तसेचं परभणी वरुन पिंगळीला जाताना दोन पेट्रोल पंप सुद्धा आहेत.रस्ता सुद्धा प्रवास करण्या लायक आहे.त्यामुळे मराठवाड्यातील हे अविश्वसनीय स्थळ एकदा पहाचं.
#incrediblemarathwada
_____________________
✍संदीप डाके । Blogger
©२०१७
ब्लॉग वाचा या लिंकवर
Add caption |
No comments:
Post a Comment